मुंबई प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून भाजपच्या गोटात उत्साह आहे. तर दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या गळाला लागल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये निरुत्साह दिसून येतो.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व वाढलं आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. विरोधी पक्ष नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये सामील करून घेतलं. तर ज्या नेत्यांना भाजपमध्ये सहभागी करून घेता आलं नाही त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. फडणवीसांनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक घेतली, मात्र, त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. आता मुख्यमंत्र्यांसमोर मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी अधिक जागा जिंकून आणण्याचे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या.
लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप सावरलेले नसल्याचं चित्र समोर येत आहे. तर दोन्ही पक्षांतील नेते पक्ष सोडून जात आहेत. दोन्ही पक्षांमध्ये अविश्वासाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोण कधी पक्षाला ‘रामराम’ करेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपलं अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान या पक्षांसमोर आहे.