Home राजकीय आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ; सावद्यात उद्या शिवसेनेची (शिंदे गट) महत्त्वपूर्ण...

आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ; सावद्यात उद्या शिवसेनेची (शिंदे गट) महत्त्वपूर्ण बैठक 


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावदा शहरात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार व कार्यसम्राट चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

ही बैठक सोमवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता कोचूर रोडवरील संकल्प सिद्धी गणेश मंदिर येथे होणार आहे. सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीसंबंधी संघटनात्मक बांधणी, प्रचारातील रणनिती आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यासंदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीत होणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या सावद्यात पुन्हा भगवा फडकवण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली नव्याने रणनीती आखली जाणार आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा उद्देश असून, शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. पक्षाची ताकद अधिक बळकट करण्यासाठी व निवडणुकीत विजयी घोडदौड करण्यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी आणि युवा सेना शहर प्रमुख मनीष भंगाळे यांनी सर्व शिवसैनिक बांधवांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा झेंडा सावद्यात अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीमुळे सावदा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून, शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना गती मिळणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम निर्णायक आणि दिशादर्शक ठरेल.


Protected Content

Play sound