जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरात तसेच असोदा रेल्वेगेटजवळ असलेल्या शेतात आज पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत एका सालदाराचा खून केला होता. या घटनेमुळे जिल्ह्यातच एकच खळबळ उडाली होती. परंतु जळगाव पोलिसांनी अवघ्या दहा तासात पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींमध्ये एक अल्पवयीन बालक आहे.
अशी आहे आरोपींची नावे
गेंदालाल मिल परीसर आणि रेल्वे परीसर या दोन पथकाकडून आरोपी कैलास लालसिंग बारेला (वय-28, रा. पांढरी ता.चोपडा), अमरसिंग बिलेरसिंग बारेला (वय-25, रा. गुजर बावडी, गुमठा धुळकोट, ता.भागवानपुरा, जि.खरगोन म.प्र), सागर गंगाराम पावरा (वय 25, रा.नाळी जोवाळी, ता.भगवानपूरा जि. खरगोन), विक्रम बाजर्या बारेला (वय-25, रा. भाळाबैडी ता.सेंधवा जि.बडवाणी) आणि एक अल्पवयीन मुलगा अश्या पाच जाणांना पकडण्यात यश आले आहे. तर पप्पु बुधा बारेला (वय-48, रा. गदडदेव ता.शिरपूर जि.धुळे हा वरील पाच आरोपींसोबत मिळून आल्याने त्याच्यावर पारोळा पोलीसात गुन्हा दाखल आहे. त्यानुसार त्याला पुढील तपासकामी पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरात अज्ञात ८ ते १० दरोडेखोरांनी लुटमार केली. मंदिरातील दानपेटी फोडत साधारण सहा ते सात हजार रुपये तसेच मंदिरातील ८ ते १० घंटे चोरून नेले. यावेळी मंदिरा शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात देखील त्यांनी लुटपाट करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने दरवाजा न उघडल्यामुळे संबंधित व्यक्ती बचावला. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित दरोडेखोर हे पावरा बोलीभाषेत बोलत होते. यानंतर दरोडेखोरांनी असोदा रेल्वेगेट परिसर गाठला. येथे पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात दौलत एकनाथ काळे (वय-६५ रा.मुक्तांगण हॉलजवळ, नेरी नाका) हे अनेक वर्षांपासून सालदार म्हणून काम पाहतात. दरोडेखोरांनी दौलत काळे यांना बेदम मारहाण करत त्यांच्या झोपडीत काही मिळेल म्हणून वस्तूंची फेकाफेक केली. परंतु त्यांना याठिकाणी देखील काहीही आढळून आले नाही. दरोडेखोरांनी काळे यांना लाकडी दांड्याने डोक्यात मारहाण करत हातपाय बांधून जवळच्या विहिरीत फेकून दिले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन व तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री.भागवत हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मिलींद सोनवणे यांना संशयीत आरोपी हे गेंदालाल मिलमध्ये एका ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्यासह पथकाने गेंदालाल मील परिसरातून ५ जणांना अटक केली. आरोपींमध्ये एक अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.