Home Uncategorized नशिराबादेत १४ कोटींच्या कामांचे लोकार्पण, ८ कोटींच्या कामांचे भूमिपूजन!

नशिराबादेत १४ कोटींच्या कामांचे लोकार्पण, ८ कोटींच्या कामांचे भूमिपूजन!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद आता झपाट्याने शहरात रूपांतरित होत असून, आगामी काळात हे गाव विकासाचे नवे केंद्र बनेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. विमानतळ आणि राष्ट्रीय महामार्ग यांसारख्या दळणवळणाच्या सोयींमुळे नशिराबादचा मोठा विकास होणार आहे. सुमारे ४ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेली अत्यंत सुंदर नवीन नगरपरिषद इमारत या विकासाचा एक महत्त्वाचा आधार ठरेल, असे ते नशिराबाद नगरपरिषदेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना म्हणाले.

आज नशिराबाद शहरात एकूण १४ कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि ८ कोटी रुपयांच्या नव्या कामांचे भूमिपूजन झाले. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा अधिक उत्तम होण्यास मदत होईल. नशिराबादकरांच्या मागणीनुसार, येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याचे आश्वासनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि रस्त्यावरील दिव्यांसाठी मंजूर केलेल्या ११० केव्हीच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून आता १२ पैकी १० महिने शून्य आकार पडणार असल्यामुळे नगरपरिषदेचा मोठा खर्च वाचणार आहे. हा वाचलेला पैसा इतर विकासाच्या कामांसाठी वापरला जाईल. केवळ १८ महिन्यांत अत्यंत गुणवत्तापूर्ण नगरपरिषद इमारत बांधली असून, या इमारतीवर एक मोठे सभागृह बांधण्यासाठी येणाऱ्या काळात निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शहरासाठी भुयारी गटारे आणि आवश्यकतेनुसार पूल दिले असल्याने, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व गोष्टी पूरक आहेत. आता सर्वांनी शहराच्या प्रगतीसाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ६०.५७ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात झाली असून, वाघूर नदीवरून फिल्टरसह पाणीपुरवठा योजनेचे कामही प्रगतीपथावर असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबादकरांना आश्वासित केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही शहराला शोभेल अशी नगरपरिषद इमारत झाल्याचे सांगून, नशिराबाद जळगाव आणि भुसावळ या दोन मोठ्या शहरांच्या मध्यभागी असल्यामुळे विकासाचे नवे केंद्र बनेल असे नमूद केले. शहराच्या विकासासाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उभारल्या जात असल्यामुळे विकासाला आणखी वेग येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात शहरात झालेल्या आणि होऊ घातलेल्या कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, शिवराज पाटील, विकास धनगर, जि.प. चे माजी सदस्य पंकज महाजन, चेअरमन योगेश पाटील, बापू बोढरे, कीर्तिकान्त चौबे, असलम सर, रमेशअप्पा पाटील, किरण पाटील, कंत्राटदार नितीन बर्हाटे, जितेंद्र महाजन, सुकलाल कोळी, शालिक कोळी यांसह शहरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. मंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपरिषदेच्या नवीन इमारतीतील विविध दालनांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound