जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जालना लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना पाठिंबा दिला आहे. जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कुठलीही आघाडी नाही आहे. मात्र जालना लोकसभेसाठी स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे.
जालना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ना महायुतीसोबत आहे, ना महाविकास आघाडीसोबत. राजू शेट्टी यांनी स्वतंत्र भूमिका घेत हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवली. येत्या 13 तारखेला जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनाही मतदान करायचं आहे, त्यांनी कुणाला मतदान करावं, आपण काही अटी-शर्ती ठेवल्या आणि त्या अटी-शर्ती ज्या उमेदवाराला मान्य असतील, त्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. आम्हाला राजू शेट्टींनी आम्हाला मुभा दिली आहे की, तुम्ही स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्या, कुणाला पाठिंबा द्यायचा आणि काय करायचे हे स्थानिक पातळीवर ठरवण्यास त्यांनी सांगितलं. त्यानुसार आम्ही कार्यकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शेतकरी हिताच्या काही मागण्या काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण समोर ठेवल्या आणि ते त्यांनी मान्य केल्या. स्वाभिमान पक्षाच्या या भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे अडचणीत आले आहे.