जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षकांची गाडी थांबवून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे घडली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, “घाणेगाव तांडा येथील आश्रम शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक प्रवीण साईदास पवार (वय ३७) राहणार महूखेडा हे आपल्या मित्रासह शाळेवर जात असताना देऊळगाव गुजरी येथील बस स्टँडवर बुधवार, दि. १४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास काहीजणांनी हेतू पुरस्कर शिक्षकांची गाडी थांबवून “तुम्ही आमची बदनामी केली.” असे म्हणत खोटी फोन रेकॉर्डिंग सादर करून शिक्षक प्रवीण पवार यांना कमरेच्या पट्ट्याने व लाथाबुक्याने बेदम मारहाण केली.
या प्रकरणावरून औरंगाबाद जिल्ह्यासह इतर ठिकाणी शिक्षकांमध्ये तणावाचे व निषेधार्थ वातावरण तयार झालेले असून अशा अरेरावी पद्धतीने शिक्षकावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींवर प्रवीण पवार यांच्या फिर्यादीवरून पोलीस प्रशासनाने आरोपी राजेंद्र गुलाबसिंग जाधव औरंगाबाद, जयेंद्र विजयसिंह राठोड घाणेगाव, कृष्णा रायसिंग पवार व मारहाण करताना त्यांच्यासोबत असलेले इतर चौघेजण राहणार देऊळगाव, गुजरी अशा एकूण सात जणांवर पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले फत्तेपुर येथील क्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी फत्तेपूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी व दिनेश मारवडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी सर्व शिक्षक संघटना व आश्रम शाळेचे संचालक मंडळ यांनी शाळेला भेट देऊन एका शिक्षकाला केलेल्या मारहाणीबद्दल निषेध व्यक्त केला; अशा दादागिरी व भाईगिरी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून अशा आरोपींना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. अशी मागणी शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.