भोईटे नगरात बंद घर फोडून लांबविले चांदीचे दागिने

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा रोडवरील भोईटे नगरात बंद घर शेजारी राहणाऱ्या दोघांनी फोडून ३० हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संजयसिंह मदनसिंह राजपूत (वय-५२) रा. भोईटे नगर, पिंप्राळा रोड जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २३ फेब्रुवारी रोजी ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून गेले होते. दरम्यान घराच्या मागे राहणाऱ्या अशोक घोरपडे व त्याचा मुलगा विकी उर्फ हेमंत अशोक घोरपडे दोन्ही रा. भोईटे नगर, पिंप्राळा रोड, जळगाव यांनी घराच्या किचनला असलेल्या ग्रीलची खिडकी तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. संजयसिंग राजपूत हे १५ मार्च रोजी घरी आल्यावर हा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी त्यांनी बुधवार १६ मार्च रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अशोक घोरपडे व त्यांचा मुलगा विकी उर्फ हेमंत घोरपडे दोन्ही रा. भोईटे नगर पिंप्राळा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर करीत आहे.

 

 

Protected Content