जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव संलग्न शाखा एरंडोल आयोजित पुस्तक भिशीचा कार्यक्रम शनिवार दि.२७ ऑगस्ट २०२२ रोजी दत्त कॉलनी, एरंडोल येथे संपन्न झाला. याप्रसंगी ‘समाजमनावर स्वतःची ओळख अधोरेखित करणं वाचन व चिंतनावर अवलंबून असते’ असे प्रतिपादन कवी वा.ना.आंधळे यांनी केले.
‘समाज मनावर स्वतःची ओळख अधोरेखित करणे वाचन व चिंतनावर अवलंबून असते. पुस्तके दिःकालापलिकडे पाहण्याची दूरदृष्टी देतात. पुस्तके स्वानुभव न घेताही सर्वार्थाने डोळस व तंत्रकुशल बनवतात.’ असे सांगत पुस्तकांचा लळा कसा लागला ? वाचन व्यासंगातून कवी व व्याख्याता म्हणून ओळख कशी निर्माण झाली ? याबाबत कवी वा.ना.आंधळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संस्थापक तथा जिल्हा प्रमुख विजय लुल्हे उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना आंधळे म्हणाले की, “पूर्वीच्या कविता संस्कार, ताकद व विचार वैभव देणाऱ्या होत्या. शिक्षकांनी समर्पणशील भावपूर्ण अध्यापनाने कवितांचे हृदयावर गोंदण केले म्हणून आजही त्या कविता संपूर्ण मुखोद्गत आहेत. इयत्ता चौथीत शिकतांना गुरुवर्य कुंभार गुरुजींनी साभिनय भावानुकूल शिकविलेली ‘ फुलपाखरू ‘ कविता सरांनी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत बालपणी शिकलेल्या कवितांमधून मानवतेचे धडे कसे मिळाले याबाबत काव्यपंक्तिंचे संदर्भ देऊन कवितांमधील सामर्थ्य सांगितले. पुस्तकांचा लळा कसा लागला व कवी व्याख्याता म्हणून ओळख कशी निर्माण झाली हे प्रसंगांन्वये ओघवत्या शैलीत आंधळेंनी सांगितले. आता शिक्षणातलं काव्य गेलं आणि जीवनातलं नाट्यही गेलं. तसेच कविता आवडतात मात्र रसिक कवितेची पुस्तके कुणी विकत घेऊन वाचत नाहीत ही खंत कवी आंधळे यांनी व्यक्त केली. “पप्पा माझ्या आईला बोलू नका, स्रीजन्म आहेच आधि मुका” या मुलीच्या विनंतीवरून लिखित प्रबोधनपर कवितेच्या सुश्राव्य काव्यगायनाने समारोप केला.
संत एकनाथ महाराजांवरील ला.रा. पांगारकर संपादित पुस्तकाचे परिक्षण आर.टी.काबरा हायस्कूल, एरंडोलच्या उपमुख्याध्यापिका शोभा पाटील यांनी केले. परिक्षणात बालपण, आठव्या वर्षी गुरु करणे, हिशोबातील एकाग्रता, गुरुभक्तीतून युद्धाला जाणे हे प्रसंग उभे करून त्यांनी समीक्षण केले.
“मॉ का आशीर्वाद चारो धाम से न्यारा है” हे मातृमहिमापर गीत रोहिणी मानुधने ( मुख्याध्यापिका, आर.टि. काबरा ) यांनी सुस्वर सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापिका अंजूषा विसपुते यांनी ‘ हृदयस्थ ‘ डॉक्टर अलका मांडगे लिखित पुस्तकाचे परीक्षण केले.
परीक्षणांत मराठी माणसाची थक्क करणारी अलौकिक झेप तसेच मांडगे यांच्या वादळी व्यक्तिमत्त्वासोबत सहजीवन जगतांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची झालेली फरफट आणि आत्मसंयम व समर्पणशील संसारातील दिव्य सांगितले. संस्काराचे सामर्थ्य व संस्कृती यातील अद्वैत विसपुते यांनी मनोविश्लेषणात्मक पद्धतीने समिक्षणातून मांडले. ‘ भलेबुरे जे घडून गेले,विसरून जाऊ सारे क्षणभर ‘ मराठी भावगीत उषाकिरण खैरनार ( माजी मुख्याध्यापिका, स.न.झवर हायस्कूल पाळधी ) यांनी सुरेल आवाजात सादर करुन टाळ्या मिळविल्या. दिपा काबरा यांनी पुस्तक भिशीच्या ध्येय धोरणांची प्रशंसा केली. भिशीची सभासद संख्याविस्तार करून उपक्रमांचा आवाका वाढविण्याचे आवाहन केले.
सारबेटा हायस्कूल, ता.अमळनेरचे मुख्याध्यापक राजेंद्र सुर्यवंशी यांनी मनोगतात जीवनातील टर्निंग पॉईंट, मोठ्या कुटूंबाची जबाबदारी व शालेय प्रशासनातील ताणतणाव यात पत्नी शारदाने अनमोल आधार दिलेले प्रसंग सांगितले.
विजय लुल्हे यांच्या ” ना नफा ना तोटा ” पुस्तक विक्री व प्रदर्शनाच्या पुस्तक स्टॉलचे उद्घाटन डॉ.उज्ज्वला राठी यांनी केले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी मुख्य शाखा जळगाव आयोजित “अनमोल भेट बालकविता संग्रहाची” अभियानांतर्गत सुप्रसिद्ध ज्येष्ठ बालकवयित्री माया धुप्पड लिखित १७ पुस्तकांचा नजराणा अभियानाचे समन्वयक विजय लुल्हे यांनी एरंडोल शाखेच्या समन्वयिका अंजुषा विसपुते व शारदा पाटील, प्रा.मिना पवार यांना सुपूर्द केली. तसेच ग्रंथदान भेट मिळालेली पुस्तके स्वाती काबरा व नगरसेविका जयश्री पाटील यांना सुपूर्द केली.
सुप्रसिद्ध बाल साहित्यिका माया धुप्पड यांच्या ‘ मनमोर ‘ काव्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कवी वा. ना.आंधळे यांच्या पत्नी रत्नप्रभा आंधळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात पुस्तक भिशी संस्थापक तथा जिल्हाप्रमुख विजय लुल्हे म्हणाले की, ” सभासद बांधवांनी पुस्तक परिचय व समीक्षण लिहिली पाहिजेत. आपल्या भिशीच्या उपक्रमांना कलारसिक मित्र मंडळींना सन्मानपूर्वक आमंत्रित करून कार्यक्रमाचा लाभ मिळवून द्यावा. पुस्तक वाचनाइतकेच मानवी मन वाचणे डोळस कलाभिरुची आहे. “पुस्तक भिशी ग्रंथ संपदा संवर्धनाएवढेच सजीव मित्रसंपदा वाढविण्याचे आवाहनही विजय लुल्हे यांनी केले.
पुस्तक भिशीच्या कार्यक्रमास श्रीलेखा सोनी, आरती पाटील, स्वाती काबरा सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन, आभार प्रदर्शन संयोजिका शारदा पाटील सुर्यवंशी यांनी केले. वैभवी बोरसे, सोनिया बडगुजर, तेजल सोनवणे, समिक्षा माळी, स्नेहल बाविस्कर या आर.टी.काबरा विद्यालयाच्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थीनींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.