महत्वाची बातमी : राज्यात लॉकडाऊन नव्हे तर कडक निर्बंध लागणार !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर राज्यात लॉकडाऊन नव्हे तर कडक निर्बंध लागणार असल्याचे स्पष्ट झाले असून आज रात्रीपर्यंत नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

 

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून यात ओमायक्रॉनचा संसर्गही वाढीस लागल्याचे अधोरेखीत झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज टास्क फोर्सची मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आज उशीरा रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला जाणार असून त्यांनी सुचविलेल्या शिफारसीनुसार नियमावली जाहीर होणार आहे.

 

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनाला तत्पर राहण्याचे निर्देश दिले. उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नका. त्याचप्रमाणे निधीला कात्री लावू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला आजच्या बैठकीत दिल्या आहेत. मात्र यात लॉकडाऊन लावणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता राज्यात कडक निर्बंध लागणार असल्याचे स्पष्ट झाले असून रात्रीपर्यंत नवीन नियमावली जाहीर करण्यात येईल. यानंतर प्रत्येक जिल्हा प्रशासना यानुसार आपापल्या जिल्ह्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करणार आहेत.

Protected Content