अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गुळ बाजार भागात कल्पेश ट्रेडिंग दुकानासमोर उभी असलेल्या कारमधून २० हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाचे कागदपत्र असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज प्रतापमल जैन (वय-५०, रा.चौबारी ता.अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मनोज जैन हे कामाच्या निमित्ताने मंगळवारी १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर शहरातील गुळ बाजार भागात आलेले होते. येथील कल्पेश ट्रेडिंग दुकानासमोर त्यांनी त्यांची कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ४५७२) ही उभी केली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने कारच्या मागच्या बाजार सीटवर ठेवलेले २० हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेलर पिशवी चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर मनोज जैन यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु चोरी संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी बुधवारी १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ हितेश चिंचोरे हे करीत आहे.