Home Cities जळगाव अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व; डॉ. संदीप नेरकर यांचे विद्यापीठात मार्गदर्शन

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व; डॉ. संदीप नेरकर यांचे विद्यापीठात मार्गदर्शन

0
150

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय संविधानाने निरक्षर लोकांमध्येही लोकशाही यशस्वी होऊ शकते, याची जाणीव जगाला करून दिली आहे, असे प्रतिपादन डॉ. संदीप नेरकर यांनी केले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात प्रवेश परिचय कार्यक्रमानिमित्त ‘भारतीय संविधानाची पंचाहत्तरी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मंगळवार, २ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.

समाजात मूलभूत अधिकारांचे संरक्षण
डॉ. नेरकर पुढे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाने प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना केंद्रस्थानी ठेवून अनेक आव्हानांना सामोरे जात यशस्वी वाटचाल केली आहे. त्यांनी संविधानाची निर्मिती प्रक्रिया ते आजपर्यंत झालेल्या घटनादुरुस्ती यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा. म. सू. पगारे उपस्थित होते, तर प्रा. प्रीती सोनी, डॉ. सुदर्शन भवरे, डॉ. दीपक खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

विविधतेला एकसंध ठेवणारे संविधान
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. पगारे यांनी ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या तीन तत्त्वांना देशाचा प्राण म्हटले. धर्म, जाती, संस्कृती, भाषा अशा विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला अस्थिर न होऊ देता, एकसंध ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे, असे ते म्हणाले. भारतीय संविधान हे जगाला ‘युद्ध नको तर बुद्ध हवा’ असा संदेश देत असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका स्नेहा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सुदर्शन भवरे यांनी केले.


Protected Content

Play sound