Home प्रशासन ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या बातमीचा दणका ! कुऱ्हा प्रशासनाला जाग डेंग्यू रोखण्यासाठी घरोघरी...

‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या बातमीचा दणका ! कुऱ्हा प्रशासनाला जाग डेंग्यू रोखण्यासाठी घरोघरी तपासणी अन् फवारणी सुरू

0
19

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर परिसरात डेंग्यूचा वाढता धोका आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने २८ सप्टेंबर रोजी ‘कुऱ्हा काकोडा भागात डेंग्यूचे थैमान’ या मथळ्याखाली ठळकपणे मांडल्यानंतर स्थानिक प्रशासनाला अखेर जाग आली आहे. या बातमीची बातमी प्रसिद्ध होताच संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाच्या यंत्रणांनी तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा तात्काळ कामाला लागली असून, कुऱ्हा परिसरात तातडीने कीटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. सध्या काही भागांमध्ये फवारणीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित भागातही हे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण कुऱ्हा गावात फवारणी पूर्ण करून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आता घरोघरी जाऊन साचलेल्या पाण्याची तपासणी केली जात आहे. नागरिकांच्या घराभोवती किंवा गच्चीवर साचलेले पाणी रिकामे करून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे मैदानावर उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोकनियुक्त सरपंच डॉ. बी. सी. महाजन यांनी गावातील सर्व नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परिसरामध्ये कुठेही स्वच्छ किंवा साचलेले पाणी साचू देऊ नका, स्वच्छता राखा आणि ताप, अंगदुखी अथवा इतर कोणतीही लक्षणे जाणवल्यास विलंब न करता तातडीने सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लावून धरल्यानंतर प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे कुऱ्हा काकोडा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या वृत्ताच्या प्रभावाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound