आयएमएने सांगितल्या ओमायक्रॉनच्या प्रतिकारासाठी उपाययोजना !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | देशात ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे सतर्कतेचे वातावरण असतांनाच आता इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेने यापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

देशातील डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या आयएमएनं ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि त्यासंदर्भात केंद्रानं करावयाच्या उपाययोजना याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.  आयएमएनं दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ओमायक्रॉनसंदर्भा भूमिका स्पष्ट केल्याचं वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे. आत्ता कुठे भारतात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र, त्यात ओमायक्रॉन आल्यामुळे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. जर आपण योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर आपल्याला करोनाच्या तिसर्‍या लाटेचा मोठा फटका बसू शकतो, असा इशारा आयएमएने दिला आहे.

दरम्यान,  देशातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना करोना लसीचा अतिरिक्त डोस घेण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. तसेच, देशातील निम्म्या लोकसंख्येला पूर्ण लसीकृत केल्याबद्दल आयएमएनं सरकारचं अभिनंदन देखील केलं आहे.

ओमायक्रॉनच्या संकटाचा सामना कसा करावा, यावर जागतिक पातळीवर संशोधन सुरू असताना आयएमएनं त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय सांगितला आहे. जर आपण पूर्ण लक्ष लसीकरणावर केंद्रीत केलं, तर ओमायक्रॉनच्या प्रभावापासून भारत स्वत:चं रक्षण करू शकेल. लसीकरणाशी संबंधित सर्वांना आयएमए आवाहन करतंय की सर्वांचं लसीकरण हेच ध्येय समोर ठेवून काम करावं. ज्यांच्यापर्यंत लसीकरण अद्याप पोहोचलेलं नाही आणि ज्या पात्र व्यक्तींनी फक्त एकच डोस घेतलाय, त्यांच्यापर्यंत यंत्रणेनं पोहोचावं, असं आयएमएनं नमूद केलं आहे.

 

Protected Content