नवी दिल्ली वृत्तसंस्था । अॅलोपॅथीचा उपचारात काहीही उपयोग होत नसल्याचा दावा करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सोशल मीडियात रामदेवबाबांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा संदर्भ आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे. रामदेवबाबा हे स्वतःदेखील अॅलोपॅथी उपचारच घेतात. असे असताना त्यांनी अॅलोपॅथीला एक मूर्ख आणि ‘बिनकामाचे विज्ञान’ म्हटले आहे. तसेच रेमडेसिवीर, फेविफ्लू आणि डीसीजीआयने मंजुरी दिलेल्या दुसऱया औषधांमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला आहे.
या पार्श्वभूमिवर, रामदेवबाबांवर साथ नियंत्रक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्र सरकारकडे केली आहे. एक तर अॅलोपॅथीला रोखा, नाही तर बाबांवर गुन्हा दाखल करा, असे थेट आव्हान आयएमएने दिले आहे.
रामदेव बाबा यांच्या विधानाने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि आरोग्य मंत्र्यांच्याच प्रतिष्ठेला आव्हान दिले आहे. त्याचबरोबर लाखो लोकांचे जीवन धोक्यात टाकले आहे. सरकारने रामदेवबाबांविरुद्ध कारवाई न केल्यास आपण कायदेशीर कारवाईचा मार्ग पत्करणार असल्याचा इशाराही आयएमएने दिला आहे. यामुळे आता रामदेव यांच्यावर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.