रिक्षातून अवैधरित्या गांजाची वाहतूक; एकाला अटक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील आसारामजी आश्रमसमोर बेकायदेशीररित्या रिक्षातून गांजाची वाहतूक करणाऱ्या तरुणावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. यात १ लाख ८० हजार रुपये किमतीचा १८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील श्री आसारामजी आश्रमसमोरून रिक्षांमधून अवैधपणे गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्यासह पथकाने शुक्रवारी, १४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता कारवाई करत सुमारे एक लाख ८० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी कोमल सिंग विकास राजपूत (वय २९, राहणार बोरखेडा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे) याला अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरलेली रिक्षादेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी, १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Protected Content