सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | शासकीय परवाना न घेता आणि स्वामीत्वधनाची रक्कम बुडवून अवैध गौणखनिज उपसा केल्याप्रकरणी येथील तीन जणांना महसूल प्रशासनाने तब्बल २ कोटी १७ लक्ष रूपयांचा दंड ठोठावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सावदा हद्दीतील दोघांवर गौणखनिज उपसा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. यात सावदा शिवारातल्या हद्दीत असणार्या गट क्रमांक १०५१ मधील बेला कैलास खंडेलवाल आणि शेख आशिक शेख निसार तसेच शेख अदनान शेख निसार या तिघांच्या नावांवर एकूण ०.७४ आर इतक्या क्षेत्रफळाची जमीन आहे. येथे अवैध माती आणि मुरूमाचा उपसा करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या अनुषंगाने महसूल खात्याने तपासणी केली असता येथे तब्बल १७५० ब्रास इतका मुरूम आढळून आला. याचा नियमानुसार पंचनामा करून याची मोजणी करण्यात आली होती. तर या संदर्भात संबंधीतांना नोटीसा बजावून त्यांचे कारण देखील जाणून घेतले होते.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार बाजारमूल्याच्या पाच पट रक्कम इतका दंड ठोठावण्यात येतो. सध्याचा मुरूमाचा बाजारभाव हा २२६४ रूपये प्रति ब्रास इतका आहे. या अनुषंगाने जप्त केलेल्या मुरूमाचे मुल्य हे १ कोटी ९८ लाख १४ हजार ८६८ इतके होते. यात स्वामीत्व धन आणि जळगाव जिल्हा खनिज प्रतिष्ठानसाठीचे एकूण मूल्य १९ लक्ष ८१ हजार ४८७ रूपये इतके जोडण्यात आले आहे. यातून एकूण २ कोटी १७ लक्ष ९६ हजार ९५५ रूपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत. परिसरात महसूल खात्यातर्फे इतक्या मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्याची ही कदाचित पहिलीच कारवाई असल्याने यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.