Home क्राईम अवैध गांजाची वाहतूक: दोन संशयितांना अटक

अवैध गांजाची वाहतूक: दोन संशयितांना अटक


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील सत्रासेन-चोपडा मार्गावर गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 28 हजार 640 किमतीचा गांजा आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दोन व्यक्ती मोटारसायकलवरून सत्रासेन ते चोपडा या रस्त्याने अंमली पदार्थ गांजाची वाहतूक करणार आहेत. या खात्रीशीर माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. मधुकर साळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाईचे नियोजन केले.

सापळा रचून सत्रासेन-चोपडा रोडवर वाहनांची तपासणी सुरू असताना, अवैध गांजाची वाहतूक करणाऱ्या मोटारसायकलवरील दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांची नावे अविनाश साहेबराव ढिवरे (वय-२६) आणि रोशन साहेबराव ढिवरे (वय-३१), दोघेही रा. खोकरी, ता. वरला, जि. बडवाणी (मध्य प्रदेश) अशी सांगितली.

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातुन ८ किलो वजनाचा 1 लाख 78 हजार 640 रुपये किमतीचा गांजा, 40 हजार किमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र.MP 46- MV-2951) आणि मोबाईल असा एकूण 2 लाख 28 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound