Home Cities रावेर रावेरमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

रावेरमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात अवैध हातभट्टीच्या दारूचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागातील अनेक युवक व्यसनाधीन होत आहेत. परिणामी महिलांचे संसार उध्वस्त होत असून सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे.

राज्यात अवैध दारूविक्री थांबवण्याचे आदेश असतानाही रावेर परिसरात मात्र हे व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे चित्र आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर, तसेच काही गावांमध्ये बिनधास्तपणे दारू विक्री सुरू आहे. याकडे उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

एका ढाबा चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “आम्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे सुविधा पुरवतो, त्यामुळे आमचा धंदा सुरळीत चालतो.” यावर उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “आम्ही नियमित कारवाई करतो. मात्र माझ्याकडे केवळ दोन महिला कर्मचारी असल्याने रात्री कारवाई करण्यात अडचणी येतात.”

मात्र प्रत्यक्षात आर्थिक व्यवहारातून ‘सेटलमेंट’ केल्यामुळे कारवाया थांबवण्यात येतात, अशी स्थानिकांची जोरदार टीका आहे. रावेर परिसरात वाढत्या अवैध दारू व्यवसायामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.


Protected Content

Play sound