अवैध डिंक तस्करीचा पर्दाफाश; वनविभागाची मोठी कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात वनविभागाने अवैध डिंक तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. अहिरवाडी आणि जुनोना येथे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १६५ किलो सालई आणि धावडा डिंक जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन दुचाकींसह एकूण ७२ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

अहिरवाडी येथे पहिली कारवाई:
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अहिरवाडी वनक्षेत्रातील कं. नं. ५ मध्ये गस्त घालत असताना एक व्यक्ती मोटरसायकलवरून गोण्या घेऊन जाताना दिसली. गाडीची तपासणी केली असता, त्याच्याकडे ९८ किलो सालई डिंक सापडला. या डिंकाची किंमत १० हजार ७८० रुपये असून, (एमएच १९ एजी १७२३) क्रमांकाची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुनोना येथे दुसरी कारवाई:
जुनोना येथील कं. नं. ८ मध्ये गस्तीदरम्यान एक व्यक्ती मोटरसायकलवरून गोण्या घेऊन जाताना दिसली. पाठलाग केला असता, आरोपीने एक गोणी फेकून पळ काढला. या गोणीत ५ हजार रूपये किंमतीचा ४७ किलो सालई डिंक मिळून आले आहे.

जुनोना येथे तिसरी कारवाई:
जुनोना येथील कं. नं. ७ मध्ये गस्त घालत असताना एक व्यक्ती मोटरसायकलवरून डिंक घेऊन जाताना दिसली. वन अधिकाऱ्यांनी पाठलाग केला असता, तो गाडी आणि माल सोडून पसार झाला. या कारवाईत (एमपी १० बीए १४६९) दुचाकी आणि ४ हजार रूपये किंमतीचा डिंक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एकूण मुद्देमाल जप्त:
या तीन कारवायांमध्ये एकूण १६५ किलो डिंक आणि दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून, जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ७२ हजार ९५० रुपये आहे. तस्करांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून संपूर्ण मुद्देमाल आगरडेपो, रावेर येथे जमा करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई निनू सोमराज (वनसंरक्षक, धुळे प्रा. वनवृत्त), जमीर शेख (उपवनसंरक्षक, यावल वनविभाग), आर. आर. सदगीर (विभागीय वन अधिकारी दक्षता, धुळे), प्रथमेश हडपे (सहा. वनसंरक्षक, चोपडा), समाधान पाटील (सहा. वनसंरक्षक, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनरक्षक जगदीश जगदाळे, आयेशा पिंजारी, सविता वाघ, वनमजूर सुभाष माळी, इनुस तडवी, विनोद पाटील यांनी ही धडक कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Protected Content