जळगाव प्रतिनिधी । चुकीच्या उपचारामुळे रूग्णाला कर्करोग झाल्याने निष्पन्न झाल्यानंतर संबंधीत बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
जाकीर सत्तार खाटीक (वय ३५, मूळ रा. नागदुली, ता. एरंडोल) याने नॅचरोपॅथीचा डिप्लोमा केला आहे. मात्र तो म्हसावद येथे सर्रास अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करत होता. दरम्यान, जितेंद्र रामा धनगर या रूग्णाला मूळव्याधीचा त्रास झाल्याने तो खाटीक यांच्याकडे उपचारासाठी गेला. मात्र या उपचारानंतर धनगर यांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांनी पोलीसात धाव घेतली. तथापि, याची कुणकुण लागताच खाटीकने म्हसावद येथील दवाखाना बंद करून पळ काढला होता. त्यानंतर मेहरूण परिसरात पुन्हा दवाखाना सुरू केला होता. ही गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना गुरुवारी मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, विशाल वाठोरे, संदीप पाटील, मिलिंद पाटील यांच्या पथकाने मेहरूण परिसरातून त्याला ताब्यात घेतले. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करर्यात आला असून जाकीर खाटीक याला अटक करण्यात आले आहे.