नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रतिकारासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असतांना आता आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांनी या विषाणूचा प्रतिकार करणारे टी-शर्ट व मलम तयार केले असून ते लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कोरोनावर सध्या व्यापक प्रमाणात संशोधन सुरू आहे. यात चीन, रशिया, भारत आणि अमेरिका या देशात लसीच्या चाचणीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. याशिवाय कोरोनाच्या माहामारीला रोखण्यासाठी इतर उपाययोजना केल्या जात आहेत. यातच आता आयआयटी दिल्लीच्या विद्यर्थ्यांनी कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी एंटी व्हायरल किट तयार केलं आहे. यात एक सॅनिटायजर, मास्क आणि लोशन, टी शर्ट यांचा समावेश आहे. या टी शर्टच्या संपर्कात आल्यास कोरोना व्हायरस नष्ट होऊ शकतो.
हा एक खास टीशर्ट असून या टी शर्टच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना व्हायरस नष्ट होईल असा दावा करण्यात आला आहे. आयआयटीचे प्राध्यापक विपिन कुमार यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरसविरोधी कपडे तयार करण्यासाठी प्रयत्न सरू होते. दीर्घ संशोधनानंतर एंटी व्हायरल किट हे नाव देण्यात आलं आहे. या टी शर्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचे कोटिंग करण्यात आले होते. कोणताही व्हायरस या कपड्यांच्या संपर्कात आल्यानंतर निष्क्रीय होऊ शकतो. या रसायनांमुळे शरीरावर कोणताही वाईट परिणाम दिसून येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
लक्षणीय बाब म्हणजे ३० वेळा धुवून या टी शर्टचा वापर केला जाऊ शकतो. सध्या स्मॉल, मीडियम आणि लार्ज साइजमध्ये टी शर्ट्स उपलब्ध आहेत. मागणी वाढल्यास महिला आणि लहान मुलांसाठीही उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. याच्या जोडीला क्लेनस्टा या नावाने कोविड प्रोटेक्शन मलम देखील तयार करण्यात आला आहे. हा मलम कोरोनाच्या प्रतिकारात उपयुक्त ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.