चाळीसगाव, प्रतिनिधी | संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. वारकरी परंपरेचा माध्यमातून सर्व समाजाला दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न होत आलेले आहेत. दुःखाला जर नाहीसे करायचे असेल तर भगवंताला आपलेसे करणे गरजेचे आहे. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत असताना विठुरायाचा निर्विकार भाव आपल्या मध्ये आला पाहिजे, असे मत ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी मंगेश चव्हाण मित्रपरिवार आयोजित सिताराम पहिलवान मळा येथे एकदंत सांस्कृतिक महोत्सवात किर्तन सोहळ्यामध्ये मांडले.
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ||
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत||
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी वारकरी परंपरेतील संतांचा अभंगांच्या आधार घेऊन चालू परिस्थितीवर भाष्य करत जीवनाला आकार देण्यासाठी, आयुष्याला आनंदी करण्यासाठी भगवंताचे मनापासून व प्रामाणिकपणे नामस्मरण करण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे संयोजक मंगेश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगत मांडतांना सांगितले की, “माझ्या कुटुंबात आम्ही सर्व वारकरी आहोत. माझे वडील व आई वारकरी आहेत. हरिपाठ मला पाठ आहे. कारण लहानपणापासून वारकरी कुटुंबाचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. याच संस्कारांच्या भावनेतून २३०० वारकऱ्यांना मी पंढरीची वारी घडवून आणली आहे. पंढरीची वारी हा माझ्यासाठी ऊर्जास्त्रोत आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून पंढरीच्या विठुरायाचा व संत परंपरेचा विचार जागर करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे.” या किर्तन सोहळ्याला बेलदारवाडी येथील पूज्य श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांची विशेष उपस्थिती होती. कीर्तन सोहळ्याला तालुकाभरातून हजारो भाविकांची उपस्थिती होती.