
भुसावळ (प्रतिनिधी) ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांनी योग्य वेळ साधून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक देवेंद्र पाटील यांनी आज भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना इंडक्शन कार्यक्रमात केले.
प्रसंगी देवेंद्र पाटील, प्रा.सीमा पाटील, प्रा.प्रीती सुब्रमण्यम, डॉ. एम. वाय. तिवारी, प्रा.किशोर चौधरी, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.धिरज पाटील उपस्थित होते. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड चालेलेली असते. आपल्या आयुष्यात चांगल्या तत्वांचे कृतीशील आचरण सुरू केले, तर आयुष्यात निश्चितच यश प्राप्त होऊ शकते. यशाचे सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे ‘एकाग्रता’, तुम्ही जे काम करायला हाती घेतले असेल, त्या कामावर तुम्ही तुमचे पूर्ण लक्ष केद्रिंत केले पाहिजे. एकाग्रता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक बनेल, याकरिता प्रयत्नशिल झाले पाहिजे.
यश प्राप्तीसाठी आपल्या आजूबाजूच्या यशस्वी लोकांचे निरीक्षण करावे. ते कोणत्या करणामुळे यशस्वी आहेत, ती तत्वे जाणून घ्यावीत. त्या तत्वांचा आपल्या आयुष्यात कृतीशील वापर करावा. जे कोणी असे करतील त्यांना यश प्राप्त करण्यापासून कोणीही परावृत्त करू शकणार नाही, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
योगाची प्रात्यक्षिके सादर
प्रा.सीमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच योगाचे महत्व पटवून सांगितले. शरीराच्या हालचाली कशा असाव्यात, योगाचे नियम वेळ, आदी महत्व्वाच्या गोष्टी पटवून सांगितल्या. योगा केल्याने मन, बुध्दी आणि शरीर यांच्या समतोलपणा राहतो. जर ताणतणाव असेल तर ते कमी होण्यास मदत होवून मानवी जीवन अधिक उत्साही बनते.
संपूर्ण दिवसभर शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न मुद्रेत असतात. याचाच परिणाम त्यांच्या अभ्यासावर दिसून येतो उस्ताह आणि एकाग्रतेमुळे फायदा होतो. यासाठी ‘योगा’ हे प्रत्येक आजारावर उत्तम औषध असून नियमित योगा केल्याने शारीरिक थकवा जाणवत नाही आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि आरोग्य देखील उत्तम राहते.