चंदीगड(वृत्तसंस्था) पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पाकिस्तानसोबत रहायचे नाही, हे अनेक वृत्तांमधून समोर आले आहे. जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या हिताचा विचार असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते चंदीगडमध्ये बोलत होते.
यावेळी त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, पाकला स्वत:चे भले हवे असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आम्हाला देऊन टाकावा. इम्रान खान खरंच पाकिस्तानचे भले चिंतत असतील आणि त्यांना भविष्यात युद्ध नको असेल तर त्यांनी हे पाऊल उचलायला हवे, असे रामदास आठवले यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांचीही स्तुती केली. नरेद्र मोदी हे ऊर्जावान पंतप्रधान आहेत. कलम 370 रद्द करण्याचा त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. पाकिस्तानने अनेकदा काश्मीरचा मुद्दा उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानने आता पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवला पाहिजे आणि ते पाकिस्तानच्या हिताचे असेल, असे आठवले म्हणाले.