जळगाव, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.१३) येथे पहिली प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली.
देशहिताच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि जनभावनांचा अनादर करणाऱ्या विरोधी पक्षांनी हिम्मत असेल तर आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ३७० कलम पुन्हा लागू करणे आणि तीन तलाक पुन्हा सुरु करण्याचे मुद्दे समविष्ट करून दाखवावे, असे खुले आव्हान मोदी यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करतानाच, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल वक्तव्य केले आहे. त्यावरून त्यांनी दोन्ही पक्षांचा उपहासात्मक उल्लेख केला. ‘थकलेले साथीदार एकमेकांचे आधार होऊ शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील युवकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाही,’ असं ते म्हणाले. मोदी यांनी विरोधकांना आव्हान दिले की, हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात मोदी सरकारने हटवलेलं कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवण्याचं आश्वासन द्यावं. विरोधक लोकांना मूर्ख बनवत असून त्यांच्यात दम असेल तर त्यांनी कलम ३७० पुन्हा लागू करावं आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर ते वाचतील का? त्यांचं राजकीय अस्तित्व राहील काय? असं प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा लागू करून दाखवा, असं आव्हानही त्यांनी दिलं.नरेंद्र मोदी यांनी यावेळी शरद पवार यांच्या एका सभेतील व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली. या इतक्या मोठ्या नेत्याचं मन इतकं लहान आहे की, त्यांनी त्या युवा नेत्याच्या डोक्यावर कोपरा मारून त्याला बाजूला केलं. आपल्या युवा नेत्यांना जे सोबत घेऊन जात नाहीत, ते महाराष्ट्राला काय पुढे घेऊन जातील, अशी टीका त्यांनी पवार यांचे नाव न घेता केली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.गिरिश महाजन, ना.गुलाबराव पाटील, खा.उन्मेष पाटील, खा.सुभाष भामरे, आ.सुरेश (राजुमामा )भोळे, आ.हरिभाऊ जावळे, आ.संजय सावकारे, आ.स्मिता वाघ, आ.शिरिष चौधरी, माजी आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, मंगेश चव्हाण,जि.प अध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सिमा भोळे, अशोक कांडेलकर, किशोर काळकर,हे व्यासपीठावर उपस्थित होते.