
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे विविध सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उत्कृष्ट महिला कर्मचारी, बचत गट आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत महापौर दीपमाला काळे यांनी महिलांनी स्वतःचे आरोग्य आणि स्वाभिमान जपून समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन केले.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महानगरपालिका इमारतीच्या प्रांगणात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, समिती सदस्य विद्या सोनवणे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, डॉ. अमृता सोनवणे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड आणि उपायुक्त धनश्री शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी तीन बचत गटांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कर्जाचे धनादेश देण्यात आले. तसेच महानगरपालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी महापौर दीपमाला काळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जळगाव शहरातील प्रत्येक महिलेमध्ये उपजत नेतृत्वशक्ती आहे. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा. महिलांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्य सक्षम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी दररोज योगा, व्यायाम किंवा पायी चालणे यासारख्या सवयी अंगीकाराव्यात. एक स्त्री सक्षम झाली तर तिच्या कुटुंबासह संपूर्ण समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचा आणि महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला स्थायी समिती सदस्य वंदना इंगळे, नगरसेवक पियुष कोल्हे, उज्वला बाविस्कर, जयश्री पाटील, अंकिता पाटील, वैशाली पाटील, कविता शिवदे, प्रतीक्षा सोनवणे, माधुरी बारी, संगीता दांडेकर, कविता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला अधिकारी गायत्री पाटील यांनी मानले.
दुपारच्या सत्रात महिलांच्या आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. ऋचा नवाल यांनी स्तनांच्या कर्करोगाविषयी तर डॉ. अंजली भिरुड यांनी गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी सविस्तर माहिती देत लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन केले. यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. खेळांमध्ये विजयी ठरलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.



