जळगाव, प्रतिनिधी | शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुटी झाल्यानंतर विध्यार्थी-विद्यार्थ्यांनींना शाळेत थांबविल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे : जळगाव शहरासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी संस्थांच्या उर्दू व मराठी शाळा सकाळ व दुपारच्या सत्रात चालतात. यात दुपारच्या सत्रातील शाळा ह्या संध्याकाळी ५ वाजता सुटतात. मात्र, अनेक शिक्षक किंवा शिक्षिका उशिरापर्यंत काही विद्यार्थी व विद्यार्थिनीना थांबवून ठेवत असल्याच्या तक्रारी अनेक पालक करीत आहेत. विशेषतः विद्यार्थीनींना शाळा सुटल्यानंतर कार्यालयीन कामाचा बहाणा करून थांबविणे नियमात नसून अशा शाळांना शिक्षण विभागाने सूचना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मनसे यासंदर्भात शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेईल. जर या भेटीत शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत आढळल्यास मुख्याध्यापकांना जाब विचारून रीतसर तक्रार करून मनसे स्टाइलने धडा शिकवला जाईल असा इशारा पत्रकात देण्यात देण्यात आला आहे.