गोहत्या बंदी कायम ठेवायचीच असेल तर भाजप हाच पर्याय ! : योगी आदित्यनाथ

मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोहत्या बंदी कायम ठेवायची असेल तर भाजपशिवाय पर्याय नसल्याचे नमूद करीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉ. सुभाष भामरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगाव येथे कॉलेज ग्राऊंडवर भव्य सभा पार पडली. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे पक्ष निरीक्षक तथा खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार अनिल बोंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे आदींसह महायुतीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी घणाघाती भाषणातून विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, धुळे व मालेगावमध्ये गोहत्या बंदी आहे. ती कायम ठेवायची असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच डॉ. सुभाष भामरे यांना निवडून द्या, असे आवाहन करण्याकरिता मी आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही गोहत्या करणार्‍याला धडा शिकविला होता. गोहत्या हे हिंदुधर्मात पाप आहे. मात्र कत्तलखान्यांमध्ये गोमातेची निर्दयपणे हत्या केली जाते. त्यावर उपाय म्हणून गोहत्याबंदी केली आहे. ही गोहत्याबंदी कायम ठेवायची असेल तर भाजपचे सरकार आले पाहिजे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

दरम्यान, योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, सध्याची कॉंग्रेस ही महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांची कॉंग्रेस राहिलेली नाही. सध्याची कॉंग्रेस सोनिया व राहूल गांधींची कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसकडे आता सांगण्यासारखे काही नाही. कॉंग्रेसच्या इंडिया आघाडीत अनेक पक्ष आहेत. त्यांचा विचार एक नाही. त्यांचा उद्देश एक नाही. त्यांचे लक्ष्य व निती एक नाही. जितके दल आहेत तितकीच त्यांची दलदल आहे. त्यांना व्हीजन नाही. त्यांच्यासमोर मिशन नाही. म्हणूनच ते कोणताही निर्णय घेवू शकतात. कॉंग्रेसकडे मुद्दे नसल्यामुळे सध्या ते अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत.

पाकिस्तानची लोकसंख्या २३ कोटी इतकी आहे. तर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी जनतेला नव्याने घरकुले, गॅस जोडण्या तसेच थेट घरापर्यंत पाणी दिले आहे. हे नव्या भारताचे चित्र आहे. यापुढे आयुष्यमान भारत योनजेत ७० वर्षांच्या व्यक्तीला सगळे वैद्यकीय उपाचर मोफत दिले जातील, अशी महत्वाची योजना आणली आहे. डॉ. सुभाष भामरे हे संसदेत प्रश्‍न उठवितात. त्यातून पुढे त्यावर योजना तयार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना निधी उपलब्ध करून देतात.म्हणूनच त्यांना निवडून देण्याचे आवाहन करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

Protected Content