जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्व केळी फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन दिवसाच्या आत वर्ग करावी, अन्यथा शुक्रवार ६ ऑक्टाबरपासून तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा प्रशासनाला जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात सर्व केळी फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी सन २०२२-२३ मध्ये हवामानावर आधारित केळी फळपीक विमा काढला होता. दरम्यान नियमानुसार नुकसान भरपाईची रक्कम पुढील ४५ दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करणे अपेक्षित होते, परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना विमा कालावधी पूर्ण होऊन देखील नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत कुठल्याही प्रकारची हालचाली दिसत नाही. तसेच चालू वर्षाच्या केळी फळपिक विमा काढणे, नवीन लागवडीकरिता खोड रोपाची खरेदी, रब्बी हंगामात लागणारा इतर क्षेत्रावर बियाणे, त्यासाठी खते, मजुरी असे प्रश्न उभे समोर आहेत. त्यात पंधरा दिवसात दसरा आणि महिनाभरात दिवाळी सण असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक चणचण बसू लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या ३ दिवसात केळी फळपिक विम्याची रककम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करावे, अन्यथा जिल्हाभरातील केळी उत्पादक शेतकरी शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.