नागपूर, वृत्तसंस्था | जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघाचे हिंदुत्व मान्य असेल तर ते भाजपासोबत येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व विचारवंत मा.गो. वैद्य यांनी दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच या भेटीनंतर मनसे आणि भाजपा एकत्र येतील अशा चर्चांनाही उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर म.गो.वैद्य यांनी आपले मत व्यक्त केले.
“जर मनसेला संघाचे हिंदुत्व मान्य असेल तर ते भाजपासोबत येतील. जर त्यांना भाजपाची भूमिका स्वीकृत असेल आणि संघाची व्यापक हिंदुत्वाची भूमिका मान्य असेल तर मनसे भाजपासोबत येईल,” असे वैद्य म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अन्य मुद्द्यांवरही भाष्य केले. सर्वच राज्यांना सुधारित नागरिकत्व कायदा लागू करावा लागेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
राज्याची पूनर्रचना आवश्यक
“राज्याची पूनर्रचना होणे आवश्यक आहे. यानंतर विदर्भ वेगळा होईल. कोणत्याही राज्याची लोकसंख्या तीन कोटींच्या वर आणि एक कोटीच्या खाली नको, असे यापूर्वी अनेकांनी सांगितले आहे. यामुळेच गोवा महाराष्ट्रापासून वेगळे झाले आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येप्रमाणे महाराष्ट्राचे तीन किंवा चार भाग होतील. छोट्या राज्यांसाठी केंद्र सरकारने प्रांत रचना आयोग नेमला पाहिजे,” असेही ते यावेळी म्हणाले.