चाळीसगाव | मी मल्हारगड अनेक वर्षे ऊन, वारा अन पाऊस झेलत या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर उभा आहे. अनेक राजवटी आल्या न गेल्या जवळच असलेल्या ‘चिमणापूर गावाचे कालांतरात चाळीसगाव’ झाले. या चाळीसगाव पासून १० कोसांवर असलेले हे माझे स्थान सांभाळून मी वर्षानुवर्षे इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
एकेकाळी मी मोठे वैभव पहिले आहे. माझा अंगा खांद्यावर असलेल्या बुरुज, तटबंदी, घोडेपागा, पाण्याच्या टाक्या, अत्यंत दिमाखात डौलाने उभ्या होत्या, मात्र काळाबरोबर मी ही थकलो, ढासळू लागलो आणि पाहता-पाहता माझ्या एक-एक वैभवी खुणा नष्ट होवू लागल्या आहेत. बुरुज ढासळले आहेत, तटबंदी पडली आहे, पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. प्राण असूनही मृत्यू शैयेवर पडलेल्या भिष्माचार्यासारखी माझी अवस्था आज झाली आहे. त्यातच काही व्यसनी लोक येवून माझ्या सान्निध्यात वेगवेगळी व्यसने करतात. त्यातून स्वत:चे शरीर तर खराब करतातच पण माझा परिसरही त्या बाटल्या आणि ग्लासांची घाण टाकून त्याची विटंबना करून जातात. काही आंबट शौकीन येवून नको ते चाळे करून निघून जातात, मी फक्त हतबलपणे हे सगळे पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. माझ्या वैभवी काळात असले प्रकार करणारे जर आले असते तर त्यावेळच्या मावळ्यांनी एकेकाचे चांबडे सोलून काढले असते पण दुर्दैव की ते आज हयात नाहीत.
अशा या अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीत गेल्या काही वर्षांपासून मात्र मला सुखाचा अनुभव देणाऱ्या काही घटना इथे पाहायला मिळत आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानची काही दुर्गप्रेमी मंडळी नियमितपणे येथे येऊन माझी काळजी घेण्याचे काम करतात. कधी पाण्याच्या टाकीमधील गाळ काढतात तर कधी प्लास्टिकची घाण साफ करतात. कधी माझा अंगा-खांद्यावर छानशी रोपे लावतात, त्यांचे संगोपन करतात. माझी पूजाही करतात. कधी नव्हे ते शेकडो वर्षांनंतर या मंडळींनी माझा नावाचा मल्हारगड ‘दसरा महोत्सव’ सुरु करून दसऱ्याला सारा परिसर फुलांनी सजवून इथे विचारांचे सोने लुटण्याचे काम केले आहे. बालगोपाळांसह या शिलेदारांचा हा इथला वावर खरोखरच माझा मनाला सुखावणारा आहे. आता तर काय या सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी माझ्या गत वैभवाच्या खुणा दाखवणाऱ्या पाट्या, दिशादर्शक फलक माझा प्रत्येक वास्तूजवळ लावले आहेत. याचमुळे मी आता न बोलताही माझी ओळख सांगू लागलो आहे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर
मी संवाद साधू लागलो आहे. या मंडळींमुळे मला माझी ओळख पुन्हा प्राप्त झाली आहे.
लेखक – दिलीप गणसिंग घोरपडे, अध्यक्ष -सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र, मोबाइल- ९७६३९५५७१६, ७७४५०२४२७१