धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिवनेरी दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवनेरी दुर्गा मित्र मंडळ मुसळी यांच्या वतीने दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील रक्तदान शिबिर, किर्तन महोत्सव, प्रबोधनपर व्याख्यान असे नानाविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाला येतांना एक वही आणि एक पेन घेऊन या जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत होईल, असा अभिनव उपक्रम देखील मंडळ राबवत आहे.
काल दि. ७ ऑक्टोबर २०२४ वार सोमवार रोजी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून चोपडा येथील उमेश मराठे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव येथील लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. तद्नंतर अतिथींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तसेच उपस्थितांना माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय, तात्यासाहेब फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इ. महापुरुषांच्या जीवनातील दाखले देऊन उद्बोधन केले. चोपडा येथील युवा व्याख्याते उमेश मराठे यांनी “भविष्यावर बोलू काही…” या विषयावर मार्गदर्शन केले. पालकांनी आपल्या मुलांना मोकळीक दिली पाहिजे, हे सांगत असतांना जगभरात विविध क्षेत्रात यशस्वी लोकांचे उदाहरणे देऊन मराठे यांनी विषयाची मांडणी केली.
कार्यक्रमाला धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील, भगवान शिंदे, रामनाथ माळी यांसह मुसळी गावातील लहान मुले, युवक, माता – भगिनी व पुरुष बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवनेरी दुर्गा मित्र मंडळाचे सदस्य निलेश पाटील, मयुरेश हेडा, नरेंद्र पाटील, दिनेश पाटील, राहुल पाटील, गणेश मराठे, पुंडलिक पाटील, राहुल पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील, हितेश पाटील, चेतन पाटील, दिपक पाटील इ.सदस्य तसेच मुसळी गावातील ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवनेरी दुर्गा मित्र मंडकाचे निलेश पाटील यांनी केले.