जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांनी स्वत: मधील आवड, निवड, छंद व क्षमतांचा समन्वय साधावा. स्वत:मधील कौशल्य ओळखून ते विकसित करण्याला प्राधान्य द्यावे, असा मोलाचा सल्ला व्यावसायिक समुपदेशक सुधीरकुमार वाघुळदे यांनी दिला.
मूळजी जेठा महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय मानसपुष्प व्याख्यानमाला झाली. यात दुसऱ्या दिवशी “करिअरच्या अनंत वाटा” या विषयावर आयोजित व्याख्यानात वाघुळदे बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन मानव्य विद्याशाखेचे प्रमुख प्रा. डॉ. डी. एस. इंगळे यांनी केले. या व्याखानमालेत पहिल्या दिवशी “महाविद्यालीन विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि ताण- तणाव नियोजन” या विषयावर संमोहन तज्ज्ञ व व्यावसायिक समुपदेशक डॉ.अनंत तोडूलकर यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी वाघुळदे यांचे व्याख्यान झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती व तंत्रज्ञान अधिकारी प्रवीण चोपडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये कशाप्रकारे संधी शोधून, ती कशी प्राप्त करावी. त्यासाठी कशी तयारी करावी. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी धेय्य निश्चित करा, असेही मार्गदर्शन चोपडे यांनी केले. मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ललिता निकम यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. बालाजी राऊत यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्राजक्ता बिरडे यांनी करून दिला. डॉ. राहुल भोईटे यांनी आभार मानाले.