जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी अजून ही पाच वर्ष विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले आहे की, आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मी विधान परिषदेच्या आमदाराचा राजीनामा देणार नाही. मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझे निवडणूक लढवण्याकडे कल नाही. अशी घोषणा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका मुलाखतीत केली आहे.
भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होईल. म्हणून मी त्याबाबतीत निश्चिंत आहे. भाजपमध्ये आल्यानंतर मला आणि महाजन दोघांना एकत्रित काम करावेच लागेल. पक्षाच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय आम्ही दोघे मिळून घेऊ. भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा विरोध नाही, विरोध नव्हता, त्यांचे नाराजीचे सूर होते. ते आता दूर झाले आहे असे नाथाभाऊ यावेळी म्हणाले.
पुढे एकनाथराव खडसे म्हणाले की, भाजपमध्ये येताना मी रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये येण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी नाकारले आणि शरद पवार यांच्या सोबत राहील असे सांगितले. तिला पुढची निवडणूक लढवायची आहे, तिला तिथे भविष्य दिसते आहे, म्हणून ती राष्ट्रवादी शरद पवार गटात राहील. रावेरची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सूचित केले होते. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपचा प्रचार करावा, तसेच रक्षा खडसे माझ्या सून आहे. या दोन्ही भूमिकेतून मी भाजपचा प्रचार करत आहे. निवडणूक भाजप लढवत आहे. मी जोडीला मदत करत आहे.