भुसावळ, प्रतिनिधी | काही राजकीय पक्षांनी यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून आपणास निवडणूक लढण्याची ऑफर दिली आहे. मात्र भाजपची विचारधारा मान्य असल्याने आपण भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास निश्चितच निवडणूक लढवू, अन्यथा पक्षाचे व वैद्यकीय आणि सेवेचे कार्य निरंतर सुरू ठेवू, असे मत येथील साई पुष्प एक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ. नीलेश महाजन यांनी आज (दि.२४) वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एका पत्रकार परिषदेत बोलत मांडले.
यावेळी ते म्हणाले की, मी सन २००२ पासून वैद्यकीय सेवेसह आरोग्य शिबिरे नियमित घेत आहे. यावल तालुक्यातील रहिवासी असल्याने व सासरवाडी आणि मामाचे घर याच तालुक्यात असल्याने माझी त्याच्याशी नाळ जुळली आहे. रावेर येथेही मी चांगली वैद्यकीय सेवा दिली असून महात्मा फुले आरोग्य योजना प्रभावीपणे राबविली आहे. आता पंतप्रधान जन आरोग्य योजना सुद्धा राबवणार आहे. उमेदवारीसाठी मी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन, प्रदेश संघटक विजयराव पुराणिक यांच्याशी चर्चा केली असून भाजपाने उमेदवारी दिल्यास त्या मतदारसंघात ‘एज्युकेशनल हब’ सुरू करून बाहेरगावी दर्जेदार शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर ही सुविधा उपलब्ध करून देईन. सुतगिरणी सुरू करण्यासह अडचणीत आलेल्या मसाकाला मार्गावर आणण्याचा माझा प्रयत्न राहील. रखडलेल्या योजना पूर्णत्वास आणुन शेळगाव बॅरेजचे काम पूर्ण करण्यात येईल. पाण्याअभावी केळी लागवड कमी झाली असून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. तरुण पिढीला रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.