नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडच्या काळात आपल्या अनेक वक्तव्यांनी वादाच्या भोवर्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज आपल्याला बोलायचे आदेश नसल्याचे सांगितल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राज्यपाल कोश्यारी हे अनेकदा वादाच्या भोवर्यांमध्ये सापडल्याचे दिसून आले आहे. आधी त्यांनी फुले दाम्पत्याबाबत केलेले वक्तव्य आणि हावभाव हे अनेकांच्या टिकेचे लक्ष्य बनले. यानंतर गेल्या आठवड्यातच त्यांनी मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती निघून गेल्यानंतर मुंबईत काहीही उरणार नाही असे बोलून खळबळ उडवून दिली होती. यावरून त्यांना माफी देखील मागावी लागली होती. तर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मोदी यांच्या आधी भारतीयांना विदेशात किंमत नव्हती असे म्हटले.
या पार्श्वभूमिवर, आज नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आयोजीत कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले. ‘येथे मुख्यमंत्री असून तेच तुमच्याशी बोलतील. मला बोलण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे’ असे म्हणून ते कार्यक्रमाच्या ठिकाणावरून निघून गेले. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.