सरन्यायाधीशांना बदनाम करण्याची मलाही होती ऑफर – वकिलाने केला गौप्यस्फोट

download 9

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्याविरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील वकिल उत्सव बैंस यांनीही याप्रकरणात उडी घेतली आहे. सरन्यायाधीशांना लैंगिक शोषण प्रकरणात बदनाम करण्याची मलाही ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

 

सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्यावर झालेले लैंगिक आरोपाचे खंडन करत न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. पुढील आठवड्यापर्यंत सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जाणूनबुजून माझ्यावर असले आरोप लावण्याचा प्रयत्न होत असल्याचेही गोगोई यांनी सांगितले होते. त्यानंतर, आता सर्वोच्च न्यायालयातील वकिल उत्सव बैंस यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. त्यामध्ये, सरन्यायाधीशांची बदनामी करण्याची ऑफर मला देण्यात आली होती. त्यासाठी, मला संबंधितांनी मोठी लाचही ऑफर केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगई यांना सरन्यायाधीशपदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशाप्रकारे त्यांची बदनामी करण्याचा डाव होता. सदर बाब सांगण्यासाठी मी सरन्यायाधीशांच्या घरी गेलो होतो. मात्र, ते घरी नसल्यामुळे त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही, असेही बैंस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात एका महिलेने सुप्रीम कोर्टाच्या २२ न्यायाधीशांना पत्र लिहून आपले लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मुख्य न्यायाधीश म्हणून २० वर्षे मी केलेल्या सेवेचे हे बक्षिस आहे का ? २० वर्षांनंतर आजही माझ्या खात्यात फक्त सहा लाख ८० हजार रुपये आहेत. एवढचं काय तर माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्याहून अधिक पैसे आहेत. माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करु शकत नाही म्हणून या प्रकारचा आरोप लावला जात आहे. न्यायव्यवस्थेला कोणीही बळीचा बकरा बनवू शकत नाही असेही गोगोई यांनी सांगितले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे महासचिव संजीव सुधाकर कलगावकर यांनी सांगितले की, महिलेकडून लावण्यात आलेले आरोप दुर्दैवी आणि निराधार आहेत. तर न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेवर लोकांचा असणारा विश्वास पाहता न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली. अशाप्रकारच्या आरोपांमुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल असेही सांगितले.

Add Comment

Protected Content