“हालायचे नाही अन् बोलायचे नाही.. नाहीतर गोळी मारीन” धमकी देत सराफ व्यापाऱ्याला लुटले! (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । शहरातील मुख्य बाजारपेठेतील कवडीवाले सराफ दुकानावर आज दुपारी चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत “हालायचे नाही अन् बोलायचे नाही.. नाहीतर गोळी मारीन” धमकी देत  ११ लाख २६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, जगदीश रत्नाकर कवडीवाले (वय-५५) रा. वाणी गल्ली यावल यांचे यावल शहरातील कोर्ट रोडवरील मुख्य बाजारपेठेत सोन्या चांदीचे बाजीराव काशिदास कवडीवाले नावाचे दुकान आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता जगदीश कवडीवाले हे दुकान उघडून व्यवसायासाठी बसले होते.  दुपारी १ वाजून १० मिनीटांनी ते दुकानात एकटेच असतांना चार अनोळखी व्यक्ती आले. चारही जणांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. चारही जण २० ते २५ वयोगटातील तरूण होते. यातील एकाने जगदीश कवडीवाले यांच्यावर बंदूक रोखून “हालायचे नाही, बोलायचे नाही नाहीतर गोळ्या मारून देईल” असे धमकावत काऊंटरवरील खुर्चीवर बसवून ठेवले. आणि दुकाने मुख्य शटर आतून बंद करून घेतले. त्यानंतर एकाने काच फोडला. तर दुसऱ्याने धान्याच्या गोणीत सोन्याचे दागिने भरले व कांऊंटरमध्ये ठेवलेले ५५ हजार रूपयांची रोकड गोणीत टाकले. त्याचवेळी जगदीश कवडीवाले यांचे वडील दुसऱ्या गेटने दुकानात येत असतांना दरोडेखोरांनी पाहिले. बंदुक रोखून ठेवलेल्या भामट्याने जगदीश कवडीवाले यांना धमकी दिली की, हा कोण आत येत आहे. त्याला दुकानाच्या बाहेरच थांबव नाहीतर गोळी मारून असे सांगितल्यानंतर जगदीश यांनी वडीलांना हात दाखवून बाहेरच थांबण्याचे सांगितले. त्यानंतर दुकानातून सर्व दागीने गोणीत टाकले आणि शटर उघडून बाहेर उभी असलेल्या पल्सर गाडीवर बसून धुम ठोकत असतांना दुकानदार जगदीश यांनी आरडाओरड केली. त्यात चौथा साथीदार पकडण्याच्या प्रयत्नात तो दुचाकीवरून खाली पडला आणि गल्लीतील बोळीतून पसार झाला. तर गल्लीतील इतर दुकानदार यांनी राजेश रणछोड श्रावगी रा. यावल मेनरोड यांनी दुचाकीचा पाठलाग करत असतांना दुचाकीवरील तिघांपैकी एकाने बंदुकीने फायर करण्याचा प्रयत्न केला परंतू फायर झाला नाही म्हणून त्याने पिस्तोल फेकू मारले. त्यानंतर पुढे पाठलाग करणारे जामीरखान साबीरखान रा. यावल यांनी मोटारसायकलला लाथ मारून खाली पाडण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्याने त्याच्याजवळी पिस्तूल खाली पडले. पुन्हा दुचाकीवर बसून तिघे कोर्ट रोड मार्गाने पसार झाले. 

गेलेला माल

५६ ग्रॅम वजनाचे २ लाख ७९ हजार ६७५ किंमतीच्या ९ अंगठ्या, १६० ग्रॅम वजनाचे ७ लाख ९२ हजार रूपये किमतीचे सोन्याच्या रिंगा, आणि ५५ हजारा रूपयांची रोकड असा एकुण ११ लाख २६ हजार ६७५ रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरोडा पडल्याची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जगदीश कवडीवाले यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात पाच अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content