औरंगाबाद (वृत्तसंस्था) मी सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याला देईल. मी राजीनामा दिला नाही. तर माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या असल्याचे राज्यमंत्री व शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसल्यानंतर तब्बल नऊ तासांनंतर सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त होते. त्यावर मी सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर देणार असून राजीनामा दिला नसल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती देणार असल्याचे सांगत माझ्यावर मातोश्रीचा कंट्रोल असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या बातम्या दिल्या त्यांनाच विचारा की मी राजीनामा दिला की?, असेही सत्तार यांनी म्हटले. आज रात्री मुंबईत जाणार असून उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.