जळगाव प्रतिनिधी । राज्यात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश लाभले नसून याच प्रमाणे जिल्ह्यातील दोन जागा कमी झाल्या असून याची जबाबदारी माझी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
पालकमंत्री ना. गिरीश महाजन हे आज जळगाव दौर्यावर होते. या दौर्यात त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ना. महाजन यांनी सांगितले की, विधान सभा निवडणूकीत जिल्ह्यात दोन जागा कमी झाल्याने ती जबाबदारी पालकमंत्री या नात्याने त्यांची आहे. भाजप व शिवसेनेच्या बंडखोरामुळे फटका बसल्याचे जागा कमी झाल्याचे ना. महाजन यांनी यावेळी कबुल केले. तर राज्यात सत्तास्थापनेसाठी ९ तारखेपर्यत वेळ असून तोपर्यत सर्व प्रश्न सुटून परिस्थिती स्थिरस्थावर होईल अशी आशा ना. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भाजपची फार काही न बोलता वेट अँड वाॅचची भूमिका असल्याचेही महाजन यांनी सांगितले. तिकडून संजय राऊत बोलत आहेत आम्ही सर्व सध्या त्यांचे एकतो आहोत असा टोला त्यांनी यावेळी लगविला. वाकोद जवळील वळणाचा पूल वाहून गेल्याने ही वाहतूक सध्या चाळीसगावकडून वळविण्यात आल्याची माहिती ना. महाजन दिली. काही गावांना पुराचा वेढा पडला असून गावांचा संपर्क तुटलेला आहे. पाऊस आता थांबलेला असल्याने परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असे आवाहन महाजन यांनी केले.