नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राहुल गांधी यांनी अखेर काँग्रेस अध्यक्षपदाबाबतचा संभ्रम दूर केला आहे. मी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. आता काँग्रेस कार्यकारी समितीने नवा अध्यक्ष नियुक्त करावा. मी या प्रक्रियेत कुठेही नसेन. मी आता पक्षाचा अध्यक्ष राहिलेलो नाही, असे राहुल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही याबाबत एक चार पानी पत्र पोस्ट करून आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी राहुल यांना निर्णय बदण्यासाठी आग्रह धरला. त्यातून गेले अनेक दिवस काँग्रेस अध्यक्षपदाबाबत संभ्रम होता. राहुल गांधी आपला निर्णय मागे घेतील, अशी पक्षाला आशा होती. मात्र, या शक्यता आता मावळल्या आहेत. राहुल यांनी राजीनाम्याचा आपला अंतिम निर्णय आज जाहीर केला असून मी आता पक्षाचा अध्यक्ष नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. मुख्य म्हणजे ट्विटरचे प्रोफाइलही त्यांनी बदलले आहे. संसद सदस्य आणि काँग्रेस सदस्य इतकाच उल्लेख त्यांनी ठेवला आहे.