Home राजकीय मी राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडत आहे ; लालूंच्या मुलीचा धक्कादायक निर्णय

मी राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडत आहे ; लालूंच्या मुलीचा धक्कादायक निर्णय

0
156


पटना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बिहारच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा उलथापालथ झाली असून राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठी फूट पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या धाकट्या मुली रोहिणी आचार्य यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती आणि कुटुंबासोबतचे सर्व संबंध तोडण्याची घोषणा केल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर “मी राजकारण सोडत आहे आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे” असा धक्कादायक खुलासा केला. निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर यादव कुटुंबाच्या घरातच सुरू असलेल्या मतभेदांना या पोस्टमुळे नवे वळण मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच लालू प्रसाद यादव यांनी मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याशी संबंध तोडले होते. तेजप्रताप यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून लढणाऱ्या निवडणुकीतील अपयशानंतर आता धाकटी मुलगीही कुटुंबापासून दुरावल्याने यादव घराण्यात तिसरा मोठा तडा गेला आहे.

रोहिणी आचार्य यांनी आपल्या पोस्टमध्ये राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय जनता दलाचे निवडणूक रणनितीकार संजय यादव तसेच रमीज या दोघांवर थेट आरोप केले आहेत. “संजय यादव आणि रमीज यांनी मला हेच करायला सांगितले. त्यामुळे मी सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारते,” असे त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर, कुटुंबातील काही व्यक्तींनी तिच्यावर अनावश्यक दबाव आणल्याचेही त्यांनी सूचकपणे म्हटले आहे. या विधानामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर RJD ला मिळालेल्या फटक्याचे पडसाद कुटुंबीय पातळीवरही उमटत आहेत. रोहिणी आचार्य यांचा संताप आणि नाराजी यापूर्वीही वेळोवेळी दिसून आली होती. सप्टेंबरमध्ये केलेल्या एका पोस्टमध्ये त्या म्हणाल्या होत्या, “मी मुलगी आणि बहीण म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावले आहे. मला कोणत्याही पदाची लालसा नाही, कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. पण माझा आत्मसन्मान सर्वांत महत्त्वाचा आहे.” त्यांच्या या भूमिकेनेच आजच्या निर्णयाची बीजे त्यावेळीच पेरली गेल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

या घटनेमुळे बिहारच्या राजकारणात मोठा धक्का बसला असून लालू यादवांच्या कुटुंबातील तणाव आता सर्वांसमोर आला आहे. RJDच्या भावी राजकीय समीकरणांवर या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.


Protected Content

Play sound