बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सतत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे, आक्रमक आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची एक वेगळी, भावनिक बाजू रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिसून आली. आंदोलन, दौरे, सभा यामध्ये सतत व्यस्त असणाऱ्या तुपकरांनी आज सकाळी बुलडाणा शहरात मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरे केले आणि बहिणीच्या प्रेमाचे राखीबंध स्वीकारले.

रविकांत तुपकर यांच्या मोठ्या बहिणी मीनाताई गवते या बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड गावच्या पोलीस पाटील आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही तुपकरांनी सगळी गडबड बाजूला ठेवत बहिणीच्या घरी जाण्याची परंपरा कायम राखली. बहिणीने राखी बांधल्यानंतर मीनाताईंनी भरल्या डोळ्यांनी सांगितले, “लाखो बहिणींचं कुंकू वाचवण्यासाठी माझा भाऊ जीवाची बाजू लावून लढतो आहे. त्याला आमचा खंबीर आशीर्वाद आहे आणि आम्ही सगळ्या बहिणी त्याच्या पाठीशी आहोत.”

रक्षाबंधनाचा हा खास क्षण तुपकरांसाठी फक्त कौटुंबिक नात्याचाच नव्हे, तर प्रेरणेचा स्रोतही बनतो. “बहिणीच्या राखीतून मला नेहमीच नवी ऊर्जा मिळते, हिम्मत येते आणि लढण्याचं बळ मिळतं,” असं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील तमाम बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आश्वस्त केलं की “तुमचं कुंकू अबाधित राहावं यासाठी मी अखेरपर्यंत लढत राहीन.”
राजकीय आणि सामाजिक आंदोलनात सतत झोकून देणाऱ्या नेत्याचं असं भावनिक रूप पाहून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाच्या निमित्ताने त्यांनी नात्यांना प्राधान्य दिलं, हे निश्चितच समाजात सकारात्मक संदेश देणारं ठरलं आहे.



