भुसावळ येथे भक्तिभावाने हरितालिकेचे पूजन (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 01 at 7.12.43 PM

भुसावळ, प्रतिनिधी | शहरात नवीन साड्या नेसून नटून-थटून कुमारिका, सुवासिनींनी मोठ्या भक्तिभावाने हरितालिकेचे पूजन केले. ओल्या वाळूची महादेवाची पिंडी मांडून, फुला-पानांची मोहक आरास साकारून आणि रांगोळी काढून हरितालिका पूजन करण्यात आले.

उत्साहाने ओथंबलेल्या वातावरणात ठिकठिकाणची महादेवाची मंदिरे आणि आसपासचा परिसर मंगलमय होऊन गेला होता. चांगला पती मिळावा याकरिता कुमारिकांनी यावेळी हरतालिकेची मनोभावे पूजा केली, तर सुवासिनींनी आपल्या सौभाग्याचे हित चिंतले. हरितालिकेची आख्यायिका प्राचीन असली तरी या बदलत्या काळातही कुमारिका व सुवासिनींनी मोठ्या श्रद्धेने हरितालिकेचे पूजन केले. घरोघरी तसेच सार्वत्रिक ठिकाणी गुरुजी बोलावून त्यांच्याकडून यथासांग पूजा करण्यात आली. यावेळी कुमारिकांनी, सुवासिनींनी परंपरेप्रमाणे उपवास केला. कोणी काही न खाता-पिता कडक उपवास, तर कुणी फलाहारावर राहणे पसंत केले. शहराच्या प्रत्येक भागातील घराघरांमधून महिला, बालिका, कुमारिका घरूनच पूजेची थाळी घेऊन जात असल्याने गल्ल्यांमधील बहुतांश रस्ते हे अशा सजलेल्या महिलावर्गाने बहरून गेले होते. महिलांनी सामूहिकरीत्या हरितालिकेची पूजा करण्याबरोबर एकत्र येण्याचाही आनंद लुटला. काही महिलांनी आपापल्या घरी हरितालिकेचे पूजन केले. आजच्या पूजनासाठी गुरुजी वर्गालादेखील प्रचंड मागणी होती. वेगवेगळ्या ठिकाणी धावाधाव करण्यापेक्षा एकाच ठिकाणी थांबून पूजा सांगण्याला गुरुजीवर्गाकडून प्राधान्य देण्यात येत होते.

 

Protected Content