मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “सध्या प्रसार माध्यम, प्रिंट मीडियापुढे मोठी आव्हानं उभी ठाकलेली आहेत. प्रिंट मीडिया सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे, असे असले तरीही प्रिंट मीडियाचा प्रभाव मात्र संपलेला नाही, पत्रकारिता हे एक कौशल्य, एक जादुगिरी आहे. त्यासाठी आपल्या कर्तव्याशी इमानदार, एकनिष्ठ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी मुक्ताईनगर येथे केले.
मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पत्रकार बहुउद्देशीय मंडळ चे वतीने दोन जुलै रोजी शहरातील पेन्शनर भवनच्या सभागृहात पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत मुक्ताई पत्रकार बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष शरद बोदडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बोदवड येथील व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष संदीप वैष्णव हे उपस्थित होते.
प्रास्ताविक पत्रकार मंडळाचे उपाध्यक्ष विनायक वाडेकर यांनी केले. याप्रसंगी श्री उज्जैनवाल म्हणाले की, सध्या प्रिंट मीडिया सुरू ठेवणे ही एक तारेवरची कसरत आहे, प्रिंट मीडिया सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे, परंतु समाजाचा आजही प्रिंट मीडियावर लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभावर विश्वास आहे, कारण समाजाला या प्रसार माध्यमाची गरज आहे. दररोज नव्हे तर क्षणाक्षणाला विविध घडामोडी घडत आहेत. त्यामुळे पत्रकारांनी अपडेट असणे गरजेचे आहे. आजच्या घडीला पत्रकारांसमोर मोठी आव्हान आहेत, शोधक पत्रकारिता करीत असताना ज्ञानाचा व आत्म्याचा शोध घेणे गरजेचे आहे, फक्त आपल्या कर्तव्याशी इमानदार राहिल्यास पत्रकारिता क्षेत्रातही मोठं यश संपादन करता येते. कारण प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे. आजच्या युगात डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे. सध्याचा काळ हा परंपरेचा नाही तर आयडियाचा आहे. सेवेला डिग्रीची नव्हे तर समर्पणाची भावना महत्त्वाची असते, असे सांगून पत्रकारिता हे एक कौशल्य तसेच हे एक जादूगिरी आहे. ही जादुगिरी प्रत्येकाने आत्मसात करावी, असा संदेश दिला.आजच्या लोकशाही पद्धतीत जनतेचा विश्वास प्रसार माध्यमांवरच आहे. सत्य मांडण्याची वृत्ती लोप पावु देऊ नका.पत्रकारितेवरील जनतेच्या विश्वासाची ज्योत कधीही विझु देऊ नका , असे आवाहनही श्री. उज्जैनवाल यांनी केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पत्रकार मंडळाचे अध्यक्ष शरद बोदडे यांनी अध्यक्ष भाषण केले ते म्हणाले की, पीडित वंचित अन्यायग्रस्त यांचा आवाज बुलंद करण्याचे काम प्रसार माध्यमे करीत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात समाजाबद्दलची संवेदनशीलता अद्यापही कायम असल्यानेच आजच्या डिजिटल युगातही जनतेच्या विश्वासाचा महत्वाचा माध्यम हे प्रसार माध्यमच आहे. त्यामुळे कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरीही जनतेच्या विश्वासास तडा जाऊ देता कामा नये, असे मतही श्री. बोदडे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मांडले.
याप्रसंगी पत्रकार मंडळाचे सल्लागार मतीन शेख , सचिव संदीप जोगी , उपाध्यक्ष विनायक वाडेकर तसेच मुक्ताई वार्ताचे संपादक संतोष मराठे , अमोल वैद्य , दीपक चौधरी , मोहन मेढे, राजेश पाटील, संजय वाडीले, छबिलदास पाटील, महेंद्र पाटील, देवेंद्र काटे, बोदवडचे पत्रकार निवृत्ती ढोले, अमोल अमोदकर, नाना पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जोगी यांनी केले तर आभार मतीन शेख यांनी मानले.