मुंबई प्रतिनिधी । ‘महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडं आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार,’ असा बोचरा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला हाणला आहे.
विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मंगळवारी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसच्या भावी अध्यक्षपदाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भावी अध्यक्ष गांधी कुटुंबातील की बाहेरील, यावरून पक्षात दोन तट पडले आहेत.
राज्याराज्यातील नेतेही आपापली मते मांडत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या नावाला ठाम पाठिंबा दिलाय.
‘महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल म्हणाल तर या सरकारमध्ये प्रचंड अंतर्विरोध आहे. त्यामुळं सरकार जितके दिवस चाललंय, तितके दिवस चालेल. एक दिवस जाईल. शेवटी ही अनैसर्गिक आघाडी आहे. ती नैसर्गिक नाही. अशी आघाडी देशाच्या राजकारणात कधीच फार काळ चाललेली नाही,’ असं फडणवीस म्हणाले.