यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील पिळोदा बु. येथे ग्रामपंचायतीने मंजूर केलेले ‘रमाई आवास योजने’चे घरकुल प्रस्ताव हे तपासाअंती नियमबाह्य असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी यांनी संबंधीतांकडुन सात दिवसांच्या आत यासंदर्भात सरपंच व ग्रामसेवक पिळोदा बु. यांच्याकडुन खुलासा मागवला असुन पुढील कार्यवाहीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन आहे.
या बाबत अधिक माहीती अशी की, पिळोदा ग्राम पंचायती अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात एकुण १३ घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समिती येथे कार्यालयास मंजुरीस पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांबाबत महाराष्ट्र नव निर्माण सेना आणि मिमआर्मी भ्रष्टाचार मुक्तीसेनेच्या माध्यमातुन संशय व्यक्त करण्यात येवुन चौकशीची मागणी करण्यात आली होती. कार्यालयाकडुन चौकशी केली असता ग्रामपंचायतीने पाठविलेल्या घरकुल प्रस्तावातील नमुना आठवर खाडाखोड करून दुरुस्त केल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे सर्व १३ घरकुले लाभार्थ्यांच्या घरांची तपासणी केली असता नमुना ८ ची तपासणी न करता लाभार्थ्यांना उतारे देण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. पिळोदा बु. सरपंचांना नमुना आठवर सही करण्याचा आधिकार नसतांना त्यांनी सह्या केल्याचे दिसून आले आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने रमाई आवास घरकुल योजने करीता चुकीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवुन कार्यालयाची दिशाभुल केलेली असल्याने सदरची बाब अत्यंत बेजबाबदार पणाची असुन, आपण कर्त्यव्यात कसुर केले असल्याने आपण सात दिवसाच्या आत या नोटीसीचा खुलासा न केल्यास आपणावर वरीष्ठ पातळीवरुन कार्यवाही करण्यात येईल, असे पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी पाठविलेल्या नोटीसीत म्हटले आहे.
सदर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी दिलेल्या २६ / ३ /१९या तारखेच्या नोटीसी ची मुदत संपलेली असतांना गटविकास यांनी अद्यापपर्यंत संबधीतांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. जर या प्रकरणी गटविकास अधिकारी यांनी कारवाईत हयगय केल्यास त्यांना धडा शिकवु, असा इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे तालुका सचिव संजय नन्नवरे, शहराध्यक्ष चेतन आढळकर, संतोष जावरे, ईस्माईल खान, आबीद कच्छी, ईसहाक मोमीन,व अकील खान यांनी लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.