जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवाजी नगरातील महावीर नगरात राहणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर वसुली अधिकारी सी.एस.इंगळे व त्यांच्या पत्नी ॲड. रेखा इंगळे हे मुलांसह परिचयातील व्यक्तीकडे घर बंद करून गेलेले असतांना त्यांच्या घरावर पाच ते सहा जणांनी हल्ला केला. घरांच्या खिडक्यांचे काचा फोडण्यासह दुचाकी, वाशिंग मशिन, खुर्च्या, झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करून रोख सात हजार रुपये, सोन्याच्या चैनसह २ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटन शनीवारी १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजून १५ मिनीटांनी घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर वसुली अधिकारी असलेले सी.एस. इंगळे यांचे जळगावातील महावीर नगरमध्ये घर आहे. शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सी.एस. इंगळे हे पत्नी ॲड. रेखा इंगळे व मुलांसह त्यांच्या परिचयातील रवींद्र वैद्य यांच्याकडे गेलेले होते. त्यावेळी शनीवारी १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री स्कूटरसह पाच ते सहा जण आले व त्यांनी घराच्या कंपाऊंडमध्ये घुसून घरावर हल्ला केला. वाशिंग मशिन उलटवून देत नुकसान केले. तसेच दुचाकी खाली पाडून नुकसान केले. खिडक्यांवर फरशा, दगड, खुर्च्या मारून काचा फोडल्या. यामुळे कंपाऊंसह घरामध्येही काचांचे खच पडले. तसेच झाडांच्या कुंड्या दरवाजावर मारून त्यादेखील फोडल्या व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकले.
हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी दरवाजाजवळील खिडकीमध्ये सात हजार रुपये असलेले पाकीट, ४० हजार रुपये किमतीचे आयपॅड, दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन असा एकूण दोन लाख ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा दरोड्याचा प्रयत्न असावा, असा अंदाज घर मालकांनी वर्तविला आहे. मध्यरात्री इंगळे कुटुंबीय घरी आले त्या वेळी त्यांना हे दृष्य दिसले.
इंगळे कुटुंबीयास पोलिसांची रात्र गस्तीचे वाहन दिसले. त्या वेळी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कुलूप उघडून पाहणी केली असता घरामध्ये खिडकीच्या काचा मोठ्या प्रमाणात दिसल्या. तसेच वरील ऐवज गायब असल्याचेही लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये पाच ते सहा जण स्कूटरसह आल्याचे दिसले. त्यात सागर नामक एक जण असल्याचे पोलिसांनी ओळखले. या प्रकरणी ॲड. रेखा इंगळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सागर नामक व्यक्तीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश पाटील करीत आहेत.