नवी दिल्ली, वृत्तसंस्था | जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृह फी महिन्याला १० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आल्याने या व इतर अनेक मुद्द्यांवर सुमारे १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता आपला मोर्चा संसदेकडे वळवला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला आहे.
जेएनयूने केलेली पूर्ण फीवाढ मागे घेण्यात यावी आणि इतर मागण्यांसाठी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आपल्या मागण्यांचे फलक, डफल्या घेऊन गाणी गात आणि घोषणा देत सकाळी साडे अकराच्या सुमारास या विद्यार्थ्यांनी संसदेच्या रस्त्याने वाटचाल सुरु केली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून या अधिवेशनामध्ये ही फीवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी विद्यार्थ्यींची मागणी आहे.
आठवड्याभरापासून सुरु आहे वाद
मागील आठवडाभरापासून जेएनयूमध्ये फी-वाढीविरोधात आंदोलन सुरु आहे. महिन्याला १० रुपये असणारी किरकोळ फी वाढून ३०० रुपये करण्याचा निर्णय जेएनयू प्रशासनाचे घेतला आहे. मात्र येथील बहुतांश विद्यार्थी हे अंत्यंत गरीब कुटुंबातील असून अशाप्रकारे फीवाढ केल्याने या विद्यार्थ्यांचे आर्थिक गणित कोलमडेल असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. फीवाढ होण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर दोन दिवस विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बाहेर मोठा निषेध मोर्चाही काढला होता. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही युजीसीच्या कार्यालयाबाहेर फी वाढीविरोधात आंदोलन केले होते. शांत
तेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलिसांविरोधात बुधवारी इथल्या शिक्षक संघटनेने कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी केली. “शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यर्थ्यांसोबत पोलिसांनी बळाचा वापर केला. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत,” असं शिक्षक संघटनेचे म्हणणे होते. विद्यार्थ्यांना किफायतशीर दरात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था उपलब्ध करुन देणे हे विद्यापीठाचे कर्तव्यच आहे. तसेच वसतिगृह स्वखर्चाच्या आधारावर चालवण्याचा नवा नियमही स्विकारार्ह नसल्याची भूमिका शिक्षक संघटनेने घेतली आहे.