जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आठ दवाखान्यात मागील तीन दिवसापासून सुरु असलेली झाडाझडती काल (शुक्रवार) संपली असल्याचे वृत्त आहे. या झाडाझडतीत कोणत्या रुग्णालयात नेमके काय सापडले? काय कारवाई करण्यात आली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीय. परंतू आयकर विभागाचे पथक महत्वपूर्ण कागदपत्र,बँक पासबुक आदी सोबत घेऊन गेल्याचे कळते.
शुक्रवारी एका रुग्णालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ६ कोटीची रोकड सापडल्याची चर्चा समोर आली होती. परंतु या संदर्भातही आज सायंकाळपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नव्हती. दुसरीकडे आयकर विभागाने आपल्या कारवाईबाबत माध्यमांना कोणतीही माहिती दिलेली नाहीय. त्यामुळे आयकर विभागाला कुठे काय घबाड सापडले याबाबत संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. राज्य आयकर विभागाच्या मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पथकांनी बुधवारी जळगाव शहरातील आठ रुग्णालये, पॅथॉलाॅजी लॅबसह डायग्नोस्टीक सेंटर्सवर सशस्त्र पोलिस बंदोबस्तात धाडी टाकून झाडाझडती घेतली होती. त्यात मू. जे. महाविद्यालय रस्त्यालगतचे डॉ. विकास बोरोले यांचे नेत्रम हॉस्पिटल, भास्कर मार्केटमधील डॉ. सुनील नाहाटा यांचे वर्धमान अॅक्सिडेंट हॉस्पिटल, इंडो-अमेरिकन हॉस्पिटल व गोल्ड सिटी हॉस्पिटल,डॉ. राजेश डाबी यांचे डाबी न्यूरो सेंटर, रिंगरोडवरील डॉ. अमोल महाजन यांचे मधुर हॉस्पिटल, डॉ. राहुल महाजन यांचे चिन्मय हॉस्पिटल व आंेकारेश्वर मंदिराजवळील डॉ. सुधीर शाह, समीर शाह यांचे शाह डायग्नोस्टीक सेंटर्ससह अाठ रुग्णालयांचा समावेश होता.
आयकार विभागाची तपासणी बुधवार ते शुक्रवार असे सलग तीन दिवस झाली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत कोणत्या ठिकाणी नेमके काय सापडले याबाबत कुठीलीही माहिती समोर आलेली नाहीय. शुक्रवारी एका रुग्णालयात ६ करोडची रोकड सापडल्याची चर्चा होती. परंतु या संदर्भात अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाहीय. आयकर विभागाने काय कारवाई केली? काही अनियमितता आढळली का? याबाबत आयकर विभागाकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीय. कारवाई पूर्ण झाल्यानंतरच आयकर विभाग माहिती देईल, असा अंदाज होता. परंतु आयकर विभागाचे पथक कुठलीही माहिती न देता परत निघून गेले असल्याचे कळते. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे जळगावच्या वैद्यकिय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडालेली आहे.